

बंगळूर : निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार सुधारणा यादीच्या नावाखाली मतदार यादीतून एक कोटीहून अधिक मते वगळण्याचा कट रचला जात असून, काँग्रेस कार्यर्त्यांनी सतर्क राहण्याचे अवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले आहे. ‘केपीसीसी’ने आयोजित केलेल्या ‘भारत छोडो दिन’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देशात मतदारांच्या हक्कांवर हल्ला होत आहे. या परिस्थितीत पक्षाने इतर कामे बाजूला ठेवून या मतदान फसवणुकीविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी मतदार यादी तपासावी. ज्यांनी आपले मतदार नोंदणी अर्ज परत केले नाहीत, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अर्ज परत करण्यास सांगावे. यादीतून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेच्या स्मरणार्थ सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून राज्यभरात युवकांच्या १० हजार संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. याची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या संघटनांना एक नवीन लोगोही दिला जाणार आहे. २०२९ पर्यंत देशात महत्त्वपूर्ण राजकीय बदल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, प्रत्येक ग्राम पंचायतीसाठी हमी योजना समितीवर सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तालुका व जिल्हास्तरीय समित्या यापूर्वीच नियुक्त करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस सरकारच्या हमी योजनांवर टीका केली होती; पण आता देशातील विविध राज्यांमध्ये याच योजना एक आदर्श म्हणून अनुसरल्या जात आहेत. राज्यात १०० काँग्रेस कार्यालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदिरा भवन व प्रियदर्शनी भवनसाठी जागा मंजूर करण्यात आल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.