Satish Jarkiholi | प्रदेशाध्यक्ष पदाबाबत माझ्याशी चर्चा : सतीश जारकीहोळी

सिद्धरामय्यांच्या पाठीत कोणीही खंजीर खुपसला नाही
Satish Jarkiholi
Satish JarkiholiPudhari
Published on
Updated on

बंगळूर : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाध्यक्षपद रिक्त होणार आहे. नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत एआयसीसी संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांनी आपल्याबरोबर चर्चा केल्याची माहिती ज्येष्ठ नेते सतीश जारकीहोळी यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विरोधात ३७ आमदारांच्या सह्या जमवून कोणीही खंजीर खुपसलेला नाही, असेही ते म्हणाले.

जारकीहोळी म्हणाले, पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन. दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे आपापल्या वरिष्ठांशी चर्चा करून यावर निर्णय घेतील. आतापर्यंत आपल्याला केपीसीसी अध्यक्षपद देण्याबाबत कोणीही कळवलेले नाही, परंतु वेणूगोपाल यांनी पक्षाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत केवळ चर्चा केली आहे. आधी सरकार स्थापनेची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.

हायकमांडसमोर मी कोणतीही मागणी केलेली नाही. उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतही चर्चा केलेली नाही. हा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह ज्येष्ठ नेते आणि इतर नेते घेतील, असेही जारकीहोळी म्हणाले.

चुकीचा आरोप

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीत त्यांच्या सहकाऱ्यांनी चाकू खुपसला, अशी राजकारणात चर्चा सुरू आहे. मात्र मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, हा आरोप पूर्णपणे खोटा आहे, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.

सिद्धरामय्यांविरोधात ३७ आमदारांच्या सह्या संग्रहित केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. हा खोटा असून आम्ही जर ३७ जणांनी त्यांच्याविरोधात सह्या जमवल्या तर त्यांच्या बाजूने १०० जण होते. मग त्याला काही किंमत नाही, काय, असा प्रश्न जारकीहोळींनी उपस्थित केला.

राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले तेव्हा ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्ता सोडली आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल पक्षाच्या कोणत्याही आमदारांशी किंवा मंत्र्यांशी चर्चा केली नाही, कारण त्यांनी हा निर्णय हायकमांडसोबत घेतला होता. त्यांनी आम्हाला त्याबद्दल माहिती दिली नाही. ठरल्यानुसार निर्णय घेतला आहे हे सिद्धरामय्यांनीच सांगितले आणि आम्ही सर्व त्याचा आदर करतो, असेही जारकीहोळी म्हणाले.

ते सहकार्य करतील

माजी मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या सुरळीत कारभारासाठी आवश्यक सल्ला आणि सूचना देतील आणि २०२८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटन मजबूत करतील, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news