

बंगळूर : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावरील ईडी छापा प्रकरणीसंबंधी ईडीचे संचालक राहुल नवीन स्वतः चौकशी करणार आहेत. त्यासाठी शनिवार दि. १२ रोजी नवी दिल्लीहून बंगळूरुला दाखल झालेली ईडी संचालकांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक समिती दोन दिवस बंगळूरुमध्येच राहणार आहे.
ईडीच्या छाप्यात मंत्री जारकीहोळी यांच्या निवासस्थानी ३.३ कोटी रुपये व विदेशी चलन सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ईडी कोणत्याही क्षणी नोटीस बजावण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. मंत्री जारकीहोळी प्रकरणात तांत्रिक पथक हे खाण कंपन्यांमधील परदेशी गुंतवणूक व भागीदारीबद्दल माहिती गोळा करणार आहे. फेमा कायद्याच्या उल्लंघनाच्या स्वरूपाबाबतच्या फाईल्सचाही आढावा घेतला जाणार आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाच घेतल्याच्या व कंत्राटदार कंपनीकडून पैसे मिळाल्याच्या आरोपांसंदर्भातील कागदपत्रांचाही आढावा घेतला जाणार आहे.
केपीएससी घोटाळा, मुडा प्रकरण व वाल्मिकी घोटाळा प्रकरणांच्या प्रगतीचा राहुल नवीन वैयक्तिकरित्या आढावा घेणार आहेत. यापूर्वी, वाल्मिकी घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारच्या एसआयटीच्या अहवालात नागेंद्र यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र केंद्रीय तपास यंत्रणा, सीबीआय व ईडीने केलेल्या स्वतंत्र तपासात नागेंद्र यांच्यावर या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे मंत्री जारकीहोळी यांच्या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी उचललेल्या पावलामुळे राज्यात एकच चर्चा सुरू आहे.