KLE Institute study: वेळापत्रकानुसार आहार औषधांइतकाच प्रभावी!

केएलई संस्थेसह भारतीय जीवशास्त्रांचे संशोधन : रजोनिवृत्त महिलांसाठी विशेष लाभदायक
KLE Institute study
KLE Institute studyFile photo
Published on
Updated on

बेळगाव : दुपारचे आणि रात्रीचे जेवण वेळेवर करा, हा आजीचा सल्ला फक्त पारंपरिक ज्ञान नाही, तर त्यामागे आहारशास्त्र दडलेले आहे. नियमित आहार घेतल्यास चयापचय आणि स्नायू-अस्थिविषयक गुंतागुंत रोखता येऊ शकते, असे भारतीय जीवशास्त्रज्ञांनी अलीकडेच केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संशोधनात बेळगावातील जीवशास्त्रज्ञांचाही समावेश आहे.

बेळगावमधील केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (काहेर) आणि लखनौतील सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीडीआरआय) जीवशास्त्रज्ञांनी संयुक्तपणे आहार पद्धतीचा अभ्यास केला. त्यानुसार शरीराच्या अंतर्गत जैविक वेळेनुसार आहार घेतल्यास चरबी संचय, इन्सुलिन प्रतिरोध, अस्थि आरोग्य आणि स्नायूंच्या मजबुतीवर अनुकूल प्रभाव पडत असल्याचे आढळले आहे. हे संशोधन ‌‘जर्नल ऑफ न्यूट्रिशन‌’मध्ये प्रकाशित झाले आहे.

प्रजनन क्षमता संपुष्टात आल्यावर स्त्रीच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे चयापचय विकार (मेटाबोलिक डिसऑर्डर्स) बळावतात. अशा गटाच्या प्रयोगासाठी उंदरांच्या मॉडेलचा वापर केला. रजोनिवृत्तीनंतरच्या इस्ट्रोजेन कमतरतेचा अभ्यास करण्यासाठी उंदरांचे अंडाशय काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांना ठराविक वेळेसाठी मर्यादित आहार देऊन चरबीचा संचय, इन्सुलिन प्रतिरोध, हाडांचे आरोग्य आणि स्नायूंची मजबुती यांवरील परिणामांचा अभ्यास करण्यात आला.

अमर्याद आहार दिलेल्या प्राण्यांमध्ये रजोनिवृत्तीनंतर चयापचय विकार दिसून आले. चरबीच्या प्रमाणात 37% वाढ, ग्लुकोज सहनशीलतेतील बिघाड, दाहक सूचकांमध्ये वाढ आणि हाडांची घनता व स्नायूंच्या अखंडतेत लक्षणीय घट दिसली. मात्र, आहाराचे प्रमाण सारखेच असूनही वेळापत्रकानुसार आहार दिलेल्या उंदरांमधील चरबीची वाढ पूर्णपणे थांबली. ग्लुकोज क्लिअरन्समध्ये 26% सुधारणा झाली आणि दाह कमी झाला.

वेळापत्रकानुसार आहार घेतल्यास ते वजन कमी करणाऱ्या औषधाच्या बरोबरीने परिणामकारक ठरते. आहाराबरोबर आहाराची वेळही तितकीच महत्त्वाची आहे.
- मदन गोडबोले, संशोधन प्रमुख, काहेर, बेळगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news