Dharwad wheat: धारवाडचा गहू पिकणार इंडोनेशियात

उच्च प्रतीचे ‘डीडब्ल्यूआर १६२’ वाण; धारवाड कृषी विद्यापीठाकडून विकसित
Dharwad wheat: धारवाडचा गहू पिकणार इंडोनेशियात
Published on
Updated on
रवी हिरेमठ

धारवाड : इंडोनेशियाच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशाला १०० टन उच्च प्रतीचे 'डीडब्ल्यूआर १६२' गव्हाचे बियाणे पुरविण्याची घोषणा केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे हे 'डीडब्ल्यूआर १६२' वाण धारवाडच्या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात प्रादेशिक अन्न सुरक्षा आणि कृषी सहकार्य मजबूत करण्यासाठी गव्हाच्या बियाणांच्या पुरवठ्यासाठी दोन्ही देशांमध्ये एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने धारवाडच्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाणांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमी कालावधीच्या आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या गव्हाच्या जाती विकसित करणे, हे १९८० च्या दशकातील एक प्रमुख उद्दिष्ट होते. त्यावेळी धारवाड कृषी विद्यापीठाचे तत्कालीन गहू पैदासकार आणि माजी कुलगुरू डॉ. आर. आर. हंचिना यांच्या नेतृत्वाखाली गहू सुधारणा कार्यक्रम सुरू केला होता. त्यानुसार शटल ब्रीडिंग पद्धतीचा वापर करून चपातीसाठी 'डीडब्ल्यूआर १६२' हे गव्हाचे वाण विकसित करण्यात आले.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा मजबूत करण्यासाठी इंडोनेशिया सरकारने आपल्या उष्णकटिबंधीय हवामानासाठी त्यांची उपयुक्तता तपासण्याकरिता भारतीय संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्राने विकसित केलेले गव्हाचे विविध वाण आयात केले होते. या चाचण्यांमध्ये धारवाड कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'डीडब्ल्यूआर १६२' वाण उजवे ठरले. त्याने इतर वाणांपेक्षा उत्तम उत्पादन व गुणवत्ता सिद्ध केली. त्यामुळे इंडोनेशियाने २००० मध्ये चाचण्यांसाठी या वाणाचे बियाणे आयात केले. तथापि, जैविक विविधता कायद्याच्या अंमलबजावणीमुळे इंडोनेशियाला चांगल्या प्रतीच्या 'डीडब्ल्यूआर १६२' बियाणांचा पुरवठा करण्यात काही अडथळे निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news