Devendra Fadnavis | काँग्रेसचा संविधानाचा अभ्यास अपुरा : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपतर्फे ‘लोकशाही वाचवा’ कार्यक्रम
Devendra Fadnavis |
Devendra Fadnavis | काँग्रेसचा संविधानाचा अभ्यास अपुरा : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस Pudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : संसदेत मंजूर झालेल्या ३३ टक्के महिला आरक्षण कायद्यातच जनगणना आणि मतदारसंघांची फेररचना पूर्ण केल्यानंतर २०२९ पासून आरक्षणावर अंमलबजावणी करण्याची तरतूद होती. त्याला त्यावेळी सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता अंमलबजावणीची वेळ येताच ते मतदारसंघ परिसीमनाला विरोध करत असून काँग्रेसचा संविधानिक अभ्यास अपुरा आहे. काँग्रेसनेच संविधानाची अवहेलना केलेली आहे, अशी टीका महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

धर्मनाथ भवनात शनिवारी भाजपच्‍या 'लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा', विषयावर आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले, राज्यघटनेनुसार दर दहा वर्षांनी मतदारसंघ पुनर्रचना करणे आवश्यक असून २०२६ पर्यंत जागांची संख्या गोठवण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. २०२६ नंतर जागा वाढवल्या जाणार आहेत. लोकसंख्येवर आधारित जागा वाढल्यास कुटुंब नियोजन यशस्वी राबवणाऱ्या महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होईल, अशी भीती होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्याच राज्यांच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा समतोल पर्याय दिला. डीएमके तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह अनेक पक्षांनी या विधेयकाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी जो संकल्प करतात तो पूर्ण करतात आणि २०२९ मध्ये महिला आरक्षण लागू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

राहुल गांधींवर टीका

निवडणूक प्रक्रियेबाबत राहुल गांधी जनतेत संभ्रम पसरवत असल्याचा आरोप करत मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले, काँग्रेस सोयीस्करपणे आरबीआय, सीएजी आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, ज्या सीएजीने घोटाळे बाहेर काढले त्यांनाच विरोधक चुकीचे ठरवत आहेत. भाजप जिंकल्यावर मतदान यंत्रे हॅक झाल्याचे आरोप केले जातात आणि काँग्रेस जिंकल्यावर तीच मशिन चांगली व शुद्ध मानली जाते. निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि हॅकर्सना १५ दिवसांचे खुले आव्हान देऊनही कोणीही ईव्हीएम हॅक करून दाखवू शकले नाही. मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना पटवून देता येत नसल्याने विरोधक केवळ 'व्होट चोरी'सारखे मुद्दे पुढे करून जनतेच्या मनात संशय निर्माण करत आहेत. राहुल गांधी हे रोज खोटे बोलून लोकांना एके दिवशी खरे वाटावे, अशी रणनीती राबवत आहेत.

आणीबाणीची आठवण

मुख्यमंत्री फडणवीस १९७५ च्या इंदिरा गांधी निवडणूक प्रकरणाचा आणि घटनादुरुस्तीचा दाखला देत म्‍हणाले, १९७१ च्या निवडणुकीत सरकारी यंत्रणा, कर्मचारी आणि पैशाचा गैरवापर या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द ठरवली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य वाटत असला तरी अंतिम निकालापर्यंत स्थगिती दिली. मात्र त्यानुसार इंदिरा गांधी संसदेत बोलू किंवा मतदान करू शकत नव्हत्या. अशा स्थितीत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची निवडणूक संविधानाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी आणि न्यायालयाचे अधिकार काढून घेण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उल्लेखनीय म्हणजे १९७५ मध्ये दुरुस्ती करून ती १९७० पासून लागू करण्यात आली, जेणेकरून निवडणुकीवरील न्यायालयीन निकाल रद्द ठरवता येईल. वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते भारतमातेच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. माजी आ. संजय पाटील यांच्‍या हस्‍ते मुख्‍यमंत्री फडणवीस यांचा शाल, पुष्‍पहार व भेटवस्‍तू देवून सत्‍कार करण्‍यात आला. व्‍यासपीठावर माजी उपमुख्‍यमंत्री डॉ. सी. एन. अश्‍वथनारायण, खा जगदीश शेट्टर, भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आ. अनिल बेनके उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.