

बेळगाव : सरकारने उत्तर कर्नाटकावर सर्वच क्षेत्रात भेदभाव व अन्याय केला असून सावत्रपणाची वागणूक दिली आहे. प्रशासकीय व्यवस्थापन सुरळीत नसल्याने उत्तर कर्नाटकाचा विकास होताना दिसत नाही. सुमारे 15 वर्षांपासून सर्व सरकारांना अनेक मागण्यांसाठी आवाहन केले आहे. परंतु, आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे, उत्तर कर्नाटकचा विकास करा अन्यथा वेगळे राज्य द्या. प्रसंगी आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा उत्तर कर्नाटकातील विविध संघटनांनी दिला.
बी. एस. येडियुराप्पा रोडवरील सुवर्णसौधच्या आवारात मंगळवारी (दि. 16) ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. उत्तर कर्नाटकासाठी त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. बेळगावला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित करावे. किमान 10 महत्वाची राज्यस्तरीय कार्यालये बंगळूरहून बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करावीत. कित्तूरमध्ये कर्नाटक विकास प्राधिकरण (केडीए) स्थापन करावे, या मागण्यांचा त्यात अंतर्भाव आहे. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करुन विकासाचा आराखडा तयार करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.
अधिवेशनात उत्तर कर्नाटकसंबंधीच्या मागण्यांचा विचार न झाल्यास स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी लावून धरली जाईल. तसेच 12 जानेवारीपासून आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे पदाधिकारी अशोक पुजारी, अॅड. बी. डी. हिरेमठ आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. यावेळी सुभाष शिरबूर, आप्पासाहेब बुगडे, नागेश गोलशेट्टी, उदय करंगीमठ, वीलनकुमार तारीहाळ यांच्यासह उत्तर कर्नाटकातील पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
वेगळे उत्तर कर्नाटक करा
आ. कागे यांचा पुनरुच्चार : आंदोलनस्थळी भेट
आमदार राजू कागे यांनी मंगळवारी पुन्हा वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याची मागणी लाऊन धरली. उत्तर कर्नाटकाचा विकास होत नसल्यामुळे वेगळ्या राज्याची मागणी लावून धरावीच लागणार आहे, असे ते उत्तर कर्नाटकाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनस्थळी बोलताना म्हणाले. त्यांनी आम्ही विकासाच्या मुद्यावर वेगळ्या राज्याची मागणी करत आहोत. या मागणीमुळे अनेक मंत्री आणि आमदारांत भीती निर्माण झाली आहे. आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत असून भेदभाव दूर करण्यासाठी वेगळ्या राज्याशिवाय पर्याय नाही, असेही आमदार कागे म्हणाले.