बेळगाव : मराठीतून सरकारी कागदपत्रे मिळण्याचा सीमावासीयांना घटनात्मक हक्क असतानाही एसआयआर अर्ज मराठीतून देण्यात आलेले नाहीतच. त्यावर आता धूळफेक करताना केवळ बीएलओंकडे मराठी अर्जांचा नमुना देण्यात आला असून, मराठी भाषिकांनी तो नमुना पाहून अर्ज भरावा, असे सांगत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मराठी भाषिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एसआयआर मोहिमेबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी म. ए. समितीने एसआयआरच्या मराठी अर्जांबाबत दिलेल्या निवेदनावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, यावेळी मराठीतून अर्ज देणे शक्य नाही; पण मराठी भाषिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ज्या भागात मराठी मतदार आहेत. त्याठिकाणच्या बीएलओंकडे मराठी अर्जांचा नमुना देण्यात आला आहे. क्यूआर कोड दिला आहे. त्यानुसार मराठी भाषिकांनी अर्ज भरावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
मराठीत अर्ज मिळत नसल्यामुळे बहिष्कार घालण्यात येत आहे, याबाबत विचारले असता मला सर्व मतदारांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्याचे त्यांना मदत करण्याचे अधिकार आहेत. लोकांनी अर्ज भरून आपले नागरिकत्व बाधित ठेवावे, एवढेच मी सांगू शकतो, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
एकीकडे मराठी भाषिकांनी केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मराठीतून अर्जांची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन मात्र यातून पळवाट काढून मराठी भाषिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करत आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय पक्षांची संमती
मराठीतून अर्ज न देता केवळ नमुना दाखविण्यात येईल, या प्रक्रियेला भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी संमती दिली आहे. त्यामुळे मराठी अर्जांबाबत वेगळा निर्णय नाही, असाही दावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केला.