

बेळगाव : भरधाव टिप्परने धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी महांतेशनगरमध्ये गोकाक रोडवर घडली. सुभाष आप्पाण्णा सुंठकर (वय 54, रा. सिद्धेश्वरनगर, कणबर्गी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सुभाष कामानिमित्त सायकलवरून चालले होते. महांतेशनगरमध्ये आले असता मागून आलेल्या टिप्परने त्यांना धडक दिली. त्यामुळे, टिप्परच्या चाकाखाली सापडून ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर चालकाने टिप्पर जागीच सोडून पलायन केले. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी तेथे धाव घेतली. उत्तर रहदारी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून जमावाला शांत केले. पंचनामा करून सुभाष यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठविण्यात आला. पोलिसांनी टिप्पर जप्त केला असून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. सुभाष यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.