

बंगळूर : विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंग झाले असले, तरी निजद व भाजपच्या आघाडीत फूट पडणार नसून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फरक पडणार नाही. काँग्रेस आमच्यात अडथळा निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचे मत केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे. रविवार (दि. २१) रोजी पक्षाचे राज्य कार्यालय जे. पी. भवन येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
मंत्री कुमारस्वामी यांनी आमचा उमेदवार उभा करण्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व भाजप विधिमंडळ पक्षनेते आर. अशोक यांच्याशी चर्चा केली होती. त्या सर्वांच्या संमतीनेच उमेदवार दिला होता. त्यामुळे आघाडीत फूट पडण्याचा प्रश्नच नाही. गेल्या तीन वर्षांपासून आमच्या आमदारांचे मतदारसंघात म्हणावे तसे काम नसल्याचे म्हणणे आहे. ही केवळ आमच्या पक्षाच्या आमदारांचीच नव्हे, तर भाजप व काँग्रेसच्या आमदारांचीही परिस्थिती आहे. त्यामुळे या निवडणुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिल्यास १०० कोटी रुपये अनुदानासोबत ५० कोटी देण्याचे आमिष देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या वीस वर्षांपासून मी पक्षाचे नेतृत्व व संघटन करत आहे. या निवडणुकीत काय होणार हे माहीत होते. तरीही उमेदवार उभा केला होता. आमच्याकडे १८ जागा होत्या. त्यापैकी एकजण आधीच बाहेर पडला आहे. त्यामुळे केवळ १७ आमदार होते. भाजपची अतिरिक्त ६ मते मिळतील, अशी आमचीच नव्हे तर सर्वांचीच अपेक्षा होती. त्यामुळे आमच्या उमेदवाराला २४ मते मिळतील असा विश्वास होता. मात्र, काही आमदार पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले नाहीत. ते अनुदानासाठी अस्वस्थ आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
येत्या विधानसभा निवडणुकीत या जनविरोधी सरकारला सत्तेतून बाहेर खेचू. क्रॉस-व्होटिंग झाल्याने पक्ष बुडणार नसून क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भाजपने माजी मंत्री सी. टी. रवी यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. जेव्हा मी दिल्लीला जाईन, तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटून यावर चर्चा करणार आहे. राज्यातून भ्रष्टाचार समूळ नष्ट होणे गरजेचे आहे. आजच्या बैठकीत मी स्वत: आमदारांना तुम्हाला दुसरीकडे सोयीचे असेल तर तुम्ही जाउ शकता. तुमचे भविष्य मला धोक्यात आणायचे नाही. त्यामुळे तुम्हाला जायचे असेल तर जा असे म्हटले आहे. मात्र अशा गोष्टी करून पक्षाचे नुकसान करू नका, असा इशारादेखील दिला असल्याचे त्यांनी सांगितले.