

बंगळूर : कर्नाटक पोलिसांची वेगळी ओळख असलेली स्लाऊच कॅप आता इतिहासजमा होणार आहे. त्याऐवजी सर्व कॉन्स्टेबल्स व पोलिसांना ‘साहेबी टोपी’ म्हणजेच पीक कॅप मिळणार आहे. या नवीन कॅपचे वितरण मंगळवारी (दि. 28) विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. तसेच यावेळी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सही (एएनटीपी) कार्यान्वित करण्यात आला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या हस्ते कॉन्स्टेबल्स व पोलिस कर्मचाऱ्यांना पीक कॅपचे वितरण करण्यात आले. मुख्य सचिव शालिनी रजनीश आणि पोलिस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, मी स्वतःसुद्धा आज प्रसिद्ध केलेले पीक कॅप मॉडेल निवडले आहे. आज आम्ही 1956 पासून म्हणजेच सुमारे 70 वर्षांपासून प्रचलित असलेल्या स्लाऊच कॅप बदलल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समान कॅप देण्यात आली आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. केवळ कॅपमध्येच नव्हे तर तुमच्या कामगिरीतही बदल करावा. राज्यात अमली पदार्थांची तस्करी सुरु आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. विक्रेते कोण आहेत, आयातदार कोण आहेत, औषधे कुठून येतात आणि या नेटवर्कचे एजंट कोण आहेत, याचा शोध घ्यावा. राज्याला लवकरात लवकर ड्रगमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.