

बंगळूर : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल राज्यातील काँग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. 9) तिरंगा यात्रेचे आयोजन करून भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.
येथील के. आर. चौकातून म्युझियम रोडवरील चिन्नास्वामी स्टेडियम ते मिन्स स्क्वेअरपर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या तिरंगा यात्रेत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विविध खात्याचे मंत्री, काँग्रेस आमदार, पक्ष नेते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह, राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, आपण सैनिकांना संदेश दिला पाहिजे की, आपण सर्वजण राज्यात एक आहोत. आपण सर्वांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. चला देश वाचवूया आणि सैनिकांना धीर देऊया. आपला देश सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे.
आमचे सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यांच्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. सैनिकांनी आपला ध्वज उंच फडकवला आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. दहशतवादाचा समूळ नायनाट करायला हवा.
गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, आम्ही आमच्या सैनिकांसोबत उभे आहोत. म्हणूनच आम्ही ही तिरंगा यात्रा आयोजित करत आहोत. आम्ही सुरुवातीपासूनच सर्व जिल्ह्यांच्या एसपींना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. अतिदक्षता विभागावर लक्ष ठेवण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जलाशय आणि महत्त्वाच्या ठिकाणांना सुरक्षा पुरवली आहे.