

बेळगाव : पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची महागाई करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणार्या केंद्र सरकारने सामान्य जनतेची मोठी फसवणूक केली. त्यामुळेच आता काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकले असून, तुम्हाला आणि आरएसएसला घाबरत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. दरवाढीच्या निषेधार्थ व संविधान बचावसाठी काँग्रेसने सोमवार, दि. 28 रोजी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या मेळाव्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत मुख्यमंत्र्यांविरोधा घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, एआयसीसीचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, डॉ. एच. सी. महादेवप्पा, एम. बी. पाटील, एच. के. पाटील, आर.बी. थिम्मापूर, अन्न नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा, खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पहलगामचा हल्ला हे भाजपचे अपयश आहे. हल्ला होणार, याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. या अपयशामुळेच भाजप त्यांच्या चुका झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करत आहे. देशातील जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी नेहमीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जनतेची फसवणूक करणार्या भाजपपासून लोकांनी सावध असले पाहिजे. भाजप जाती आणि धर्माच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, गगनाला भिडणार्या किमती आणि घटत्या उत्पन्नाचे कारण हमी योजनांची अंमलबजावणी आहे. शेतकर्यांना मदत करण्यासाठी दुधाच्या किमतीत 4 रुपये वाढ करण्यात आली आहे. पण भाजपने शेतकरीविरोधी धोरण अवलंबले आहे. राज्यातील सर्व विभागांकडून विकास सुरू आहे. भाजप संविधानाच्या विरोधात काम करत आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याची नितांत गरज आहे. काँग्रेस सरकार सर्वांसाठी समानतेच्या धोरणाखाली काम करत आहे. जगभरातील उद्योजक कर्नाटकात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. भाजप भावनांचे राजकारण करत आहे.
काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले, भाजपकडून जनतेची लूट सुरू आहे. तेलाच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. 4500 कोटींनी वाढ झाली आहे. टोलचे दरही वाढवण्यात आले आहेत. काँग्रेस सरकार हमी योजनेद्वारे लोकांच्या खात्यात 53,000 कोटी रुपये जमा करत आहे. मात्र, भाजप सरकार लोकांच्या खिशातून 5500 कोटी रुपये काढत आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, काँग्रेसने 2 वर्षे यशस्वीरित्या सरकार चालवले आहे. पंचहमी योजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र, भाजप याबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे. केंद्र सरकारने महागाई वाढविल्यानेे देशातील जनता ओझ्याखाली दबली गेली आहे. याला पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कर्नाटकात काँग्रेस सरकार गेल्या 2 वर्षांपासून सत्तेत असून राज्यातील जनतेचे जीवन चांगले बनवण्यासाठी काम करत आहे. सरकारने पंचहमी योजना जाहीर केल्या आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला दिला. मात्र, भाजपकडून याबद्दल अपप्रचार सुरू आहे. भाजपने त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष मिटविण्यासाठी आणि त्यांच्या जागा टिकवून ठेवण्यासाठी जनाक्रोश नावाची नवीन मोहीम सुरू केली आहे. मात्र, त्याला कधीच यश येणार नाही.