BK Hariprasad: श्रीरामाला पित्यासाठी वनवास, येडियुराप्पांना पुत्राच्या भ्रष्टाचारामुळे कारावास!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हरिप्रसाद यांची टीका; विजयेंद्र हे भ्रष्टाचाऱ्यांचे पितामह
BK Hariprasad
BK Hariprasad
Published on
Updated on

बंगळूर : भ्रष्टाचारी नेत्यांचे पितामह असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यामुळेच माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना तुरुंगात जावे लागले होते, असा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे. एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी आपल्या वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवास पत्करला, तर दुसरीकडे येडियुराप्पा यांनी आपला मुलगा विजयेंद्र याच्यासाठी शक्य असलेल्या प्रत्येक ठिकाणी सह्या करून लाच स्वीकारली व तुरुंगवास भोगला आहे. रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा हा विरोधाभास आहे, असेही हरिप्रसाद म्हणाले.

राम मंदिराच्या देणगीत चोरी झाल्यामुळे प्रदेश काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर विजयेंद्र यांनी टीका करताना काँग्रेसने स्वतःची नैतिकता तपासावी, असे म्हटले होते. त्या टीकेला शुक्रवारी उत्तर देताना हरिप्रसाद म्हणाले, सत्तेत असताना चेकद्वारे लाच घेतल्याबद्दल तुरुंगात गेलेले मुख्यमंत्री म्हणून येडियुराप्पांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. अशा परिस्थितीत विजयेंद्र यांनी नैतिकतेचे धडे देणे हास्यास्पद आहे.

विजयेंद्र यांनी जुनी कागदपत्रे काढून तपासावीत. त्यांचे वडिल येडियुराप्पा तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांनी किती प्रकरणे सीबीआयकडे सोपवली होती? येडियुराप्पा तुरुंगात गेल्यानंतर आलेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रकरणे सीबीआयकडे सोपवली? उलट २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने अनेक प्रकरणे सीबीआयकडे सोपवली होती. केंद्रात भाजप सत्तेत असतानाही काँग्रेसने सीबीआयकडे सोपवलेल्या सर्व प्रकरणांमध्ये आम्हाला ‘क्लीन चिट’ मिळाली आहे.

हरिप्रसाद पुढे म्हणाले, येडियुराप्पांनी सत्तेत असताना प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर कृत्ये केली आहेत. सत्ता सोडल्यानंतरही त्यांनी एका असहाय्य अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. अशा घरातील मुलाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या दानपेटीतील पैशांच्या चोरीत आरोपींची बाजू घेणे हे विशेष नाही.

अयोध्येत भाजप व संघ परिवाराच्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार संपूर्ण देशाने पाहिला आहे. भाजपशासित उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणी एसआयटी चौकशी करत आहे. तथापि, रामाला दिलेल्या देणग्या लुटल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी आणखी कोणाचा राजीनामा मागावा? मोदींनी राम मंदिराची पायाभरणी केली, त्यांनीच ट्रस्टवर सदस्यांची नियुक्ती केली! आता जर ट्रस्टचे नेते, भाजप व आरएसएस एकत्र येऊन रामाच्या हुंडीतील पैसे लुटत असतील, तर कोणी राजीनामा दिला पाहिजे, असा प्रश्न हरिप्रसाद यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news