

बेळगाव : सीपीएड मैदानावर काँग्रेसच्या संविधान वाचवा आणि महागाईविरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी सोमवार दि. 28 रोजी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तातडीने पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला होता.
राज्यातील काँग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या दरवाढीच्या धोरणांसह संविधान वाचवा आंदोलनाचे आयोजन सोमवारी येथील सीपीएड मैदानावर केले होते. काँग्रेसच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या या मेळाव्यादरम्यान भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘गो पाकिस्तान’ अशी घोषणाबाजी करत गोंधळ करण्यास सुरुवात केला.
त्यानंतर तातडीने या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेे. काँग्रेसच्या काही नेत्यांची भाषणे झाल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचे भाषण सुरु होताच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहनात बसविले.
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिस वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांबरोबर पोलिसांची जोरदार वादावादी झाली. शेवटी घेराव घातलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवत गोंधळ घातला. भाषण सुरू असतानाच हा गोंधळ उडाल्यामुळे मुख्यमंत्री संतापले. त्यांनी आपले भाषण थांबविले आणि येथील जिल्हा पोलिस प्रमुख कोण आहे, त्याला व्यासपीठावर बोलवा, असे म्हटले. त्यावेळी धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख एन. व्ही. बरमणी व्यासपीठावर गेले असता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्यावर हात उगारला व आपला रोष व्यक्त केला.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मेळाव्यात येऊन गोंधळ घातल्यामुळे त्यांना तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालताच मंत्री हेब्बाळकर व्यासपीठावरून खाली उतरल्या आणि त्यांच्या दिशेने धावून गेल्या. यावेळी पोलिसांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण सुरु होत असताना त्यांचा निषेध करत गोंधळ माजवल्याचा ठपका ठेवत कॅम्प पोलिसांनी सहा महिलांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये शिल्पा श्याम केंकरे, पवित्रा मल्लय्या हिरेमठ, रेश्मा राजू भरमाचे, सुमित्रा उत्तम जालगार, अन्नपूर्णा चंद्रकांत हावळ व मंजुळा चन्नबसाप्पा हन्नीकेरी यांचा समावेश आहे. या सर्वांवर बीएनएस 189 (1) (सी) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मुख्यमंत्र्यांचा अवमान करणे अशा कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या सर्वांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. कॅम्पचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला या प्रकरणाचा तपास करीत आहेत.