प्रल्हाद जोशींविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार
बंगळूर : कोरोना काळातील घोटाळ्याची चौकशी करणारे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांच्याबाबत अपमानास्पद टीका करणारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे केली आहे.
महसूल मंत्री कृष्णा ब्यायरेगौडा आणि आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 11) राज्यपालांची भेट घेतली. प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या विधानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी केलेल्या अपमानास्पद टीकेची गांभीर्याने दखल घेऊन कारवाईचे आदेश द्यावेत, असे शिष्टमंडळाने सांगितले.
दिनेश गुंडुराव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपले पद आणि त्या पदाची जबाबदारी विसरून एका न्यायमूर्तींविरुद्ध अपमानास्पद टीका केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना तक्रार दिली आहे. कोरोना काळात भाजपची सत्ता होती. त्यावेळी कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. पीपीई किट आणि कोरोनावर नियंत्रणासाठी आवश्यक उपकरणे दामदुप्पट दर देण्यात आला होता. याविरुद्ध निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांच्या आयोगाने चौकशी केली. त्यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार तत्कालिन मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांची चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेबाबत केंद्रीय मंत्री जोशी यांनी संशय व्यक्त केला असून खालच्या पातळीवर टीका केली आहे. प्रल्हाद जोशी हे सामान्य व्यक्ती नाहीत. ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी वैयक्तिक टीका केली आहे. लोकशाही मूल्यांना यामुळे धक्का पोहोचला आहे. न्यायालयीन आयोगाबाबत संशय व्यक्त करणे चुकीचे आहे. न्यायालयीन निर्णयाविरोधात टीका करणे चुकीचे असल्याचे मत मंत्री गुंडुराव यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले प्रल्हाद जोशी?
माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि माजी आरोग्यमंत्री श्रीरामुलू यांना कोणतीही नोटीस न देता मायकल डी. कुन्हा आयोगाने अंतरिम अहवाल सादर केला आहे. सरकार सत्तेवर येऊन दीड वर्षे झाली आहेत. याआधीच याविषयी चौकशी का केली नाही? कुन्हा आयोगाला अंतरिम अहवाल सादर करण्याची घाई का झाली? कुन्हा तुम्ही न्यायमूर्ती आहात, सरकारचे एजंट नव्हे.’ अशा शद्बात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टीका केली. शिग्गाव येथे जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही टीका केली.

