

विजापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेला विरोध करत 1998 साली तामिळनाडूतील कोईमतूरमध्ये घडवून आणलेल्या स्फोटातील मुख्य संशयिताला तब्बल 27 वर्षांनी विजापुरात अटक करण्यात आली आहे. सादिक राजा ऊर्फ टेलर राजा ऊर्फ शहजाहान अब्दुल मजीद मकानदार ऊर्फ शहजाहान शेख (वय 50) असे त्याचे नाव असून, तो ओळख लपवून विजापुरात भाजी विक्रेता म्हणून कुटुंबासह राहत होता. त्याला तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. सदर स्फोटात 50 जण ठार झाले होते.
1998 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अडवाणी यांना लक्ष्य करून त्यांच्या कोईमतूरमधील सभेत करण्यात आलेल्या स्फोटामध्ये 58 लोकांचा मृत्यू आणि 250 लोक जखमी झाले होते. टेलर राजा त्यातील मुख्य संशयित होता. या स्फोटासह विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला तामिळनाडू पोलिस, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि गुप्तचर विभागाच्या सहकार्याने विजापूर शहरातून अटक करण्यात आली.
टेलर राजा मूळचा चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथील रहिवासी असून, कोईमतूर स्फोटानंतर कर्नाटकमधील हुबळी व विजापूर या शहरांमध्ये मागील 27 वर्षांपासून तो ओळख लपवून राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्फोटानंतर हुबळी गाठलेल्या टेलर राजाने हुबळीतील एका महिलेशी विवाह केला. त्यानंतर पहिली 15 वर्षे तो हुबळीतच राहिला. त्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून विजापूर शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पोलिसांनी राजाला अटक केल्यानंतर कोईमतूरला नेले आहे.