

बेळगाव : थांबलेल्या ट्रकला कँटरने दिलेल्या धडकेत क्लीनर जागीच ठार झाला, तर चालक जखमी झाला. मंगळवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव-जांबोटी रस्त्यावर किणयेजवळ हा अपघात झाला. मधू कल्लाप्पा अष्टेकर (वय 40, रा. बिजगर्णी, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. कँटरचालक शुभम नागेश चौगले (रा. सावगाव) हा किरकोळ जखमी झाला.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बेळगावहून भाजीपाला घेऊन कँटर मंगळवारी रात्री गोव्याकडे निघाला होता. किणयेजवळ रस्त्याच्या कडेला बंद पडलेला ट्रक (केए 22 सी 6461) थांबला होता. चालकाला ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव कँटरची ट्रकला धडक बसली. त्यात मधूच्या डोक्याला, पायाला व छातीला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. चालक शुभम जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताची पत्नी लक्ष्मी मधू अष्टेकरने दिलेल्या फिर्यादीनुसार अपघाताची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे. पोलिसांनी कँटरचालक शुभम व रस्त्यात कोणतीही दक्षता न घेता थांबविलेल्या ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी तपास करीत आहेत.