Chikodi crime: अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून, आरोपीला फाशीची शिक्षा
चिकोडी : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार व निर्दयीपणे खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व दहा लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. बेळगाव अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सोे न्यायालयाने हा निकाल दिला. भरतेश मिरजे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी, 15 ऑक्टोबर 2019 रोजी कुडची पोलिस स्थानक व्याप्तीतील एका गावात अल्पवयीन मुलगी घरातून चॉकलेट आणण्यासाठी बाहेर गेली होती. ती परत न आल्याने तिच्या वडिलांनी कुडची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता दुकानातून चॉकलेट घेऊन घराकडे परत येत असताना घराशेजारी राहणारा भरतेश मिरजे याने त्या मुलीला आपल्या घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती ओरडल्याने गळा दाबून ओढणीने आवळून तिचा खून केला.
त्यानंतर साडीने मृतदेहाला दगड बांधून घरासमोर असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिला. खून करून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीवर कलम 363, 302, 201, 376(2) (आय) (जे) आयपीसी व 4, 6 पोक्सोे कायदा 2012 अंतर्गत बेळगाव अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व विशेष जलदगती पोक्सोे न्यायालय-1 मध्ये आरोपपत्र दाखल करून प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आरोपी भरतेश मिरजे याला फाशीची शिक्षा व दहा लाखांचा दंड ठोठावला.
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुग लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणी डीवायएसपी एस. व्ही. गिरीष, तपास अधिकारी पीएसआय जी. एस. उपार, सीपीआय एन. महेश, के. एस. हट्टी यांनी चौकशी करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
तब्बल सहा वर्षांनंतर शिक्षा
या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कुडचीसह अनेक गावांमधील नागरिकांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला होता. तब्बल सहा वर्षांनंतर त्या अल्पवयीन मुलीच्या मारेकर्याला शिक्षा झाली असून, मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.

