Belgaum Rain: चिकोडीत जोर; बेळगावात उघडीप

चिकोडी, निपाणीतील सहा बंधारे पाण्‍याखाली; बेळगावात सूर्यदर्शन, सायंकाळनंतर पावसाला प्रारंभ
Belgaum Rain: चिकोडीत जोर; बेळगावात उघडीप
Published on
Updated on

चिकोडी : चिकोडी उपविभागात रविवारी (दि. ५) सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू होती. दुसरीकडे बेळगाव परिसरात पावसाने थोडीफार विश्रांती घेऊन उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. काही काळ सूर्यदर्शनही झाले. सायंकाळी सातनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला; पण जोरदार पाऊस झाला नाही.

महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. परिणामी, चिकोडी उपविभागातील चिकोडी व निपाणी तालुक्यातील सुमारे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कल्‍लोळ-येडूर, कुन्‍नूर-बारवाड, भोजवाडी-कुन्‍नूर, जत्राट-भिवशी, कारदगा-भोज, कुर्ली-चिखली हे बंधारे पाण्‍याखाली गेले आहेत.

यंदा जूनमध्ये पाऊस न झाल्यामुळे चिकोडी उपविभागातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्या कोरड्या पडल्या होत्या; पण गत दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी उपविभागातील नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. चिकोडी व निपाणी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पातळीत दोन दिवसांमध्ये दहा फुटांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून सुमारे ५४ हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत वाहून येत आहे. पाण्याचा विसर्ग तासाला वाढत आहे. त्यामुळे, चिकोडी व निपाणी तालुक्यातील सुमारे सहा हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुसरीकडे अथणी, रायबाग व कागवाड तालुक्यात नद्यांच्या पाणी पातळीत मंद गतीने वाढ होत असून कोणताही बंधारा पाण्याखाली गेलेला नाही.

चिकोडी उपविभागीय प्रशासन कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून तेथील पावसाचे प्रमाण, आगामी काळात धरणातून होणाऱ्या विसर्गाविषयी माहिती घेत आहेत. तसेच चिकोडी उपविभागातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांना नदीकाठावरील गावांवर लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

शहर परिसरात जोर ओसरला

शहर परिसरात शुक्रवारी (दि. ३) रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी (दि. ५) सकाळपासून कमी झाला. दिवसभरात मोठा पाऊस झाला नाही. पण, वाऱ्याचा जोर अधिक होता. अधूनमधून लहान-मोठ्या सरी येत होत्या.

संततधार पावसामुळे शनिवारी शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. रविवारी पावसाने उसंत घेतली, तरी सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचून होते. त्यामुळे रविवारी थोडीफार उघडीप मिळाल्यानंतर महापालिका व कँटाेन्मेंट बोर्डाने तातडीने रस्त्यांवर साचलेले पावसाचे पाणी उपसण्याबरोबर गटारीतील पाण्याच्या निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या पाण्याला वाट करून देण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत होते. कॉलेज रोडवर यंदे खुटजवळ गटारीत कचरा अडकल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. ते पाणी शनिवारी वनिता विद्यालयात शिरून सगळीकडे पाणीच पाणी झाले. धर्मवीर संभाजी चौकातही पाणी थांबून राहिल्याने बसथांब्यात पाणी शिरले. कँटोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱ्यांनी गटारीतील अडकलेला कचरा बाजूला करण्याचे काम हाती घेतले.

रविवारी पहाटेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली; मात्र सकाळी दहानंतर सूर्यदर्शन झाले. पावसाने उघडीप दिल्याने ग्राहकांनी बाजारात गर्दी केली. पुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news