Chikodi Gandhi Katta : चिकोडीतील ‘गांधी कट्टा’ मोजतोय शेवटच्या घटका

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वारशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांतून नाराजी
Chikodi Gandhi Katta
Chikodi Gandhi Katta
Published on: 
Updated on: 
काशिनाथ सुळकुडे

चिकोडी : स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला चिकोडी शहरातील ऐतिहासिक ‘गांधी कट्टा’ आज प्रशासकीय अनास्थेमुळे दयनीय अवस्थेत पोहोचला आहे. देशात आणि जगात महात्मा गांधींच्या विचारांचा जयजयकार होत असताना चिकोडीतील हा ऐतिहासिक ठेवा मात्र अस्तित्वाची लढाई लढत असून शेवटच्या घटका मोजत आहे.

१९२० च्या सुमारास खिलाफत चळवळ आणि स्वातंत्र्यसंग्रामाच्या प्रचारासाठी महात्मा गांधींनी बेळगाव, निपाणी, संकेश्वर आणि चिकोडी परिसराला भेट दिली होती. चिकोडी भेटीदरम्यान सध्याच्या 'के. सी. रस्त्यावर' एका भव्य कट्ट्यावर त्यांची ऐतिहासिक सभा पार पडली. या सभेत गांधीजींनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात दिलेले धगधगीत भाषण ऐकून चिकोडी शहर आणि तालुक्यातील शेकडो तरुण पेटून उठले आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. पुढे गांधीजींच्या या स्मृती जपण्यासाठी हा कट्टा ‘गांधी कट्टा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

दिग्गज नेत्यांच्या सभांचा साक्षीदार

गांधीजींच्या सभेनंतर या कट्ट्याला अनन्यसाधारण राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा या कट्ट्यावर गाजल्या आहेत.

पूर्वीच्या काळात या कट्ट्याची उंची इतकी होती की त्यावर चढण्यासाठी शिडी लावावी लागत होती. मात्र, कालांतराने रस्त्यांची कामे, अतिक्रमण आणि देखभालीअभावी हा भव्य कट्टा आज अवघ्या एक फुटाचा उरला आहे. शहराच्या मध्यवर्ती के. सी. रस्त्यावर असूनही आजच्या तरुण पिढीला याच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी कोणतीही माहिती नाही.

अस्वच्छता आणि मद्यपींचा अड्डा

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज या कट्ट्याची दुरवस्था झाली आहे. कट्ट्याचे दगड निखळले असून या ठिकाणी कोणताच माहिती फलक लावण्यात आलेला नाही. कट्ट्यावर स्वच्छता तर दूरच, पण मद्यपी आणि गर्दुल्ले येथे बसतात, झोपतात आणि घाण करतात. शांततेचा संदेश देणाऱ्या महात्म्याच्या स्मारकाची ही विटंबना पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय स्मारक घोषित करून नूतनीकरणाची मागणी

दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त मोठ्या गप्पा मारल्या जातात. मात्र, या ऐतिहासिक गांधी कट्ट्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेचे त्वरित नूतनीकरण करून त्याचा कायापालट करावा आणि या ठिकाणाला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित करावे, अशी मागणी चिकोडीतील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ठरेल.

भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेले महात्मा गांधीजी आपल्या चिकोडी शहराला भेट दिल्याचा ऐतिहासिक ठेवा आज नष्ट होत आहे. या ठिकाणी लोक घाण करत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन याचा विकास करत स्मारक करावे.
-रवींद्र बोरगावे, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news