

निपाणी : मधुकर पाटील
चिकोडी विभागाचे पोलीस उपधीक्षक (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडर यांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून त्यांचे लवकरच वितरण होणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या चांगल्या कामगिरीच्या अहवालानुसार शनिवारी केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कर्तव्यदक्ष २१ पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर केले असुन बेळगाव जिल्ह्यात एकमेव गौडर यांना हे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
विशेष म्हणजे १४ ऑगस्ट २०२४ रोजी गौडर यांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री पदकापाठोपाठच त्यांना आता राष्ट्रपती पदकही जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डीएसपी गौडर हे मूळचे व्हनवाड (ता.तिकोटा,जि.विजापूर) येथील रहिवासी आहेत. ते गेल्या २७ वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी या कालावधीत ७ वर्ष पोलीस उपनिरीक्षक (फौजदार), १२ वर्ष सीपीआय तर ६ वर्ष डीएसपी पदावर सेवा बजावली असून गेल्या दीड वर्षापासून ते चिकोडी उपविभागाचे पोलीस अधीक्षक डीएसपी पदावर कार्यरत आहेत.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या कार्यकिर्दीत आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे व घटनांचा वेळीच उलगडा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हे पदक जाहीर केले आहे. लवकरच दिल्ली येथे या पदकाने त्यांना गौरविण्यात येणार आहे.