

बंगळूर : पंचहमी योजनांसाठी मोठी तरतूद, विकासकामे, सर्व आमदारांच्या मागण्या पूर्ण करणे, अनुसूचित जाती व जमातींसाठी तरतूद अशा विविध कसरतींसह सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या शुक्रवारी (दि. 7) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या राजकीय जीवनातील हा 16 वा अर्थसंकल्प असणार आहे.
गतवर्षी 2024-25 मध्ये 3.71 लाख कोटींचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केला होता. यावेळी 4 लाख कोटींचा अर्थसंकल्प असणार आहे. गतवर्षी पंचहमी योजनांसाठी 52 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. यावेळी हे प्रमाण 59 हजार कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे. विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 55,877 कोटी रुपये गुंतवणूक खर्च वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1952-53 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री केंगल हनुमंतय्या यांनी राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. तो अर्थसंकल्प 21.03 कोटींचा होता. त्यांनी एकूण चार अर्थसंकल्प सादर केले होते. याआधीच्या अर्थकसंल्पामध्ये राज्याचे अंतर्गत उत्पन्न 28,09,063 कोटी रुपये असेल असा अंदाज होता. यापैकी 1,05,246 कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव होता. 2023-24 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण 23 टक्के वाढीव होता. यंदा उत्पन्न 32 लाख कोटींचे असल्याचा अंदाज असून दीड लाख कोटींचे कर्ज असेल. आर्थिक वर्षअखेर इतर अंतर्गत उत्पन्न 24 टक्के असणार आहे.
महसूलवाढीसाठी सध्या कोणतेही उपाय नाहीत. त्यामुळे कर्ज घेण्याचा पर्याय सरकारने निवडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सरकारपर्यंत महसूल संग्रहाचे काम योग्यरीत्या झाले नाही. यावर अर्थसंकल्पात काही मार्ग शोधण्यात आले आहेत. उपलब्ध आर्थिक स्रोतांऐवजी महसूलवाढीसाठी नवे स्रोत शोधण्याची वेळ सरकारवर आली आहे. कर गळतीवर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. बंगळूरसह अनेक प्रमुख शहरांमध्ये सरकारी मालमत्ता वापराविना पडून आहे. काही ठिकाणची मालमत्ता भूमाफियांनी बळकावली आहे. त्या मालमत्तांचा शोध घेऊन सरकारी महसूल वाढवता येणे शक्य होणार आहे.
शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, अन्न व नागरी पुरवठा, समाज कल्याण, कृषी, बागायत, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास अशा विविध खात्यांतील योजनांकडेही मुख्यमंत्र्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. गेल्या महिनाभरात अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकांमध्ये चर्चा करून प्रत्येक खात्यासाठी, योजनांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.