

चंदगड : चंदगड फाटा ते चंदगड या दरम्यान शहापूर, बेळगाव येथील कारला किराणा दुकानदार दुचाकी स्वारने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी (दि. 22) मृत्यू झाला.
मूळचे सत्तेवाडी (ता. चंदगड, व सध्या मुंबई) येथील किराणा दुकानदार तानाजी बाळू खामकर (वय 54) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची वर्दी संबंधित कारचालक साई संतोष कळगदगी (वय 26, शहापूर, खडेबाजार, बेळगाव) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 रोजी तानाजी हे चंदगड फाटा हून चंदगड मधील महावितरण कार्यालयाकडे दुचाकीवरून काही कामासाठी येत होते. यादरम्यान त्यांचा ताबा सुटल्याने चुकीच्या बाजूला जाऊन चंदगडहून बेळगावकडे जाणाऱ्या कारला धडकले. यात त्यांच्या डोकीला जबर मार लागला होता. प्रथम त्यांना चंदगड ग्रामीण रुग्णालय, नंतर गडहिंग्लज व पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा सोमवारी (दि. 22) सकाळी मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक देसाई करत आहेत.