

बंगळूर : केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने बँकाॅकहून बंगळूरला आणला जात असलेला १३.१४ कोटी रुपयांचा ३८.३४ किलो हायड्रोपोनिक गांजा सोमवारी (दि. १५) जप्त केला आहे. याप्रकरणी सहा प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. हा गांजा सामानांच्या बॅगांमध्ये लपवलेला होता.
गेल्या काही महिन्यांपासून केंपेगौडा विमानतळावर बँकाॅकहून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, बँकाॅकहून येणाऱ्या प्रवाशांवर कस्टम्सने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांतर्गत सोमवारी बँकाॅकहून उतरलेल्या काही प्रवाशांच्या बॅगांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यात एकूण २४.८ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ८.६८ कोटी रुपये आहे. तर शनिवारी (दि. १३) बँकॉकहूनच आलेल्या एका विमानातून उतरलेल्या एका प्रवाशाला थांबवून त्याची बॅग तपासण्यात आली. त्यावेळी त्या बॅगेत १३.५४ किलो व्हॅक्यूम-पॅक केलेला हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. त्याची किंमत ४.८६ कोटी रुपये होते. अशा पद्धतीने दोने कारवायांत १३.१४ कोटी रुपयांचा ३८.३४ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा संशयितांविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.