Camera Evolution: २ मेगापिक्सेल ते १०० मेगापिक्सेल ते एआय!

बुद्धिमान कॅमेऱ्यांमुळे छायाचित्राचा प्रवास ‘प्रत्यक्षाहूनही प्रतिमा सुंदर’!
Camera Evolution
Camera Evolution
Published on
Updated on
सुनील गावडे

बेळगाव : एक छायाचित्र हजार शब्दांहूनही अधिक बोलते, असे मानले जाते... आता तर कॅमेऱ्याला एआयची जोड मिळाल्यानंतर ‘प्रत्याक्षाहूनही छायाचित्र सुंदर’ म्हणण्याची वेळ आली आहे. पण हा प्रवास कधीकाळी फोटोच्या फिल्मपासून सुरू झाला होता. तो डिजिटल फोटोग्राफीकडे पोहोचला आणि २००६ मध्ये स्मार्टफोनने जन्म घेतल्यानंतर २ मेगापिक्सेलच्या अगदी किमान दर्जाच्या कॅमेऱ्यांनी झेप घेत आज १०० मेगापिक्सेलचा ‘मेगा’ टप्पा गाठला आहे.

कोडॅक वन थाऊजंड लाईये और फोटोग्राफर बन जाईये... ही नव्वदीच्या दशकातील जाहिरात प्रत्यक्षात उतरली ती मोबाईलमधील कॅमेऱ्यामुळेच. कोडॅक कंपनी गेली; पण आज हर कोई फोटोग्राफर आहे, कारण हर किसी के पास स्मार्ट फोन आहे... आणि तो आता इतका स्मार्ट झालाय की अगदी दूर असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील बारीक रेषा, कपड्यांचा पोत आणि आजूबाजूच्या दृश्यातील बारकावेही सहज टिपता येतात. हा प्रवास म्हणजे केवळ आकड्यांची वाढ नसून डिजिटल फोटोग्राफीच्या उत्क्रांतीची रोमांचक कहाणी आहे.

पर्यटन, वाढदिवस, कौटुंबिक सोहळ्यांतील फोटो म्हणजे अनमोल ठेवा. त्यांचे काय कौतुक. त्यासाठी कॅमेरा, फिल्म, फोटोग्राफर, निगेटिव्ह अन्‌ प्रत्यक्ष मुद्रित फोटो ही एका तासांची मोठी साखळी प्रक्रिया होती. ती एका क्षणापर्यंत आणली ती मोबाईल कॅमेऱ्याने. मोबाईल फोनमध्ये कॅमेरा येणे हा फोटोग्राफीच्या इतिहासातील मोठा टप्पा.

२ मेगापिक्सेलपासून कॅमेरा तंत्रज्ञान सुधारत गेले आणि ५, ८, १२ मेगापिक्सेलचे कॅमेरे स्मार्टफोनमध्ये आले. १२ एमपी हा स्मार्टफोन कॅमेऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेला टप्पा. पुढच्या टप्प्यात स्मार्टफोनमध्ये ४८ एमपी आणि ६४ एमपी कॅमेरे आले. शिवाय केवळ मेगापिक्सेल वाढले नाहीत, तर कॉम्प्युटेशनल फोटोग्राफीही महत्त्वाचे बनली. एचडीआर, नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, एआय सिन डिटेक्शन प्रोसेसिंग या तंत्रज्ञानामुळे मोबाईल कॅमेरे अधिक सक्षम झाले. कॅमेरा आता फक्त फोटो काढत नाही, तर फोटोवर संगणकीय प्रक्रिया करून तो अधिक चांगला बनवतो.

फिल्मच्या निगेटिव्हपासून डिजिटल सेन्सरपर्यंत, डिजिटल कॅमेऱ्यापासून स्मार्टफोनपर्यंत, मेगापिक्सेलपासून एआयपर्यंत कॅमेऱ्याने स्वतःला बदलले. दोन एमपी हा फक्त सुरुवातीचा आकडा होता. १०० एमपी हा शेवट नाही. मोबाईल तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगतच होत राहील.
- डी. बी. पाटील, छायाचित्रकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news