

कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील दूधगंगा नदीकाठी असलेल्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. केबलमधील तांबे धातू मिळवण्यासाठी चोर्या वाढल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. विद्युत मोटारी व केबल चोरी करणारी टोळी सक्रिय असून या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आप्पासाहेब खोत, अनिल काशीद, बाळासाहेब बाळीकाई, धनंजय मोनाप आदी शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरट्यांनी कापून नेल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या केबलची चोरी आठ दिवसांपूर्वीही झाली होती. रात्रीच्यावेळी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटे महागड्या केबल कापून नेत आहेत. सध्या तांबे धातूचे दर गगनाला भिडले असल्याने अशा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे धारदार शस्त्रांचा वापर करून मोटारजवळील व पेटीजवळील वायर कापून नेत असल्याच्या घटना घडत आहेत.
तोडलेल्या वायरी पुन्हा जोडण्यासाठी वायरमन व नवीन वायरिंगसाठी मोठा खर्च येत असून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा ठरत आहे. केबल चोरी करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.