

बेळगाव : बंगळूरच्या धर्तीवर बेळगाव शहराचा विकास करण्याची योजना आखण्यात आली आहे. बेळगाव नगर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) यासाठी मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणापासून 50 किलोमीटरपर्यंत शहराचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी आसपासच्या 58 गावांचा समावेश बुडामध्ये करण्यात आला आहे.
हुबळी-धारवाडनंतर बेळगाव शहराचा क्रमांक लागतो. 2050 च्या काळात शहराचा भौगोलिक विस्तार 150 वरुन 180 किमीपर्यंत होईल. त्यामुळे, बुडाने आतापासूनच याची तयारी सुरु केली आहे. शहरावरील ताण यामुळे कमी होणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्नाटक शहर आणि ग्रामीण योजना कायदा 1961 कलम 4(ए) नुसार बेळगाव तालुक्यातील 58 गावांचा समावेश बुडामध्ये केला जाणार आहे.
बेळगाव शहरात चार ठिकाणांहून प्रवेश करता येतो. त्या चारही प्रवेशद्वारांवर टाऊनशीपसाठी बुडाने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ग्राम पंचायतींमधील लोकसंख्या, घरे, वसाहती आदींची माहिती संग्रहित केली जात आहे. नव्या वसाहती, उद्योगांसाठी बुडाच्या परवानगीची सक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जून 2024मध्येच जारी करण्यात आला आहे. तरीही काही ग्राम पंचायतींनी आदेशाचे पालन न करता कामांना मंजुरी दिली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे बुडा अधिकार्यांनी कळवले आहे.
राज्य सरकारने बेळगाव स्थानिक शहर योजनेच्या कार्यक्षेत्रात 58 गावांचा समावेश केला आहे. पण, संबंधित ग्राम पंचायत प्रशासनांचा यास विरोध आहे. घर बांधकाम, नव्या वसाहती, कुक्कुटपालन, वीट भट्टी, उद्योग, व्यवसाय आदींसाठी बुडाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केली आहे. ती मागे घ्यावी अशी मागणी पंचायत प्रशासनाची आहे. गरीब, रोजंदारी कर्मचारी, शेतकर्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे.
होनगा, कलखांब, मुचंडी, अष्टे, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री के.एच., बाळेकुंद्री बी.के., होन्नीहाळ, माविनकट्टी, बसरीकट्टी, मास्तमर्डी, कोंडसकोप, धामणे, येळ्ळूर, यरमाळ, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, कल्लेहोळ, सुळगा, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी (जाफरवाडी), अलगा, कडोलीसह 58 गावांचा समावेश बुडामध्ये होणार आहे.
शहरात वसाहत निर्माणासाठी मास्टरप्लॅन तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात 58 गावांचा समावेश बुडामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे, शेतकर्यांच्या जमिनींचा दर वाढणार आहे.
लक्ष्मण चिंगळे, बुडा अध्यक्ष