

बंगळूर : बीपीएल कार्ड मंजुरीसाठी सध्या असलेली वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1.20 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. ज्येष्ठ नेते आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय सुधारणा समितीने दिलेल्या अहवालानुसार हा बदल केला जाणार आहे.
विधानसभेच्या प्रश्नोत्तर सत्रात गुरुवारी भाजप नेते डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुंडूराव म्हणाले, बीपीएल कार्डचे लाभार्थी निवडण्यासाठी आठ वर्षांपूर्वी उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली होती. परंतु, आता एकूणच सगळ्यांची वार्षिक उत्पन्नाची पातळी वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने बीपीएल कार्डची उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या शक्यतेचा आढावा घेतला आहे.
सरकारचे असे मत आहे की, वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवावी. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अहवालात बीपीएल कार्ड मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निकषांनुसार राज्यात 1.09 कोटी बीपीएल कार्ड असायला हवेत. हे कार्ड मिळविण्यासाठी 2017 मध्ये निकष तयार करण्यात आले होते, असेही मंत्री म्हणाले.