

Boy Dies in Road Accident in Kankanwadi Raibag
अंकली : मोठ्या बहिणीसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या एका ५ वर्षीय मुलाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१२) सायंकाळी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कंकणवाडीच्या बाहेरील निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर घडली. मुथुराज मुगळखोड (वय ५ ) असे अपघातातील मृत बालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालक आपल्या मोठ्या बहिणीसह पहिल्यांदाच बुधवारी नागनूर शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला गेला होता. त्यानंतर परत घरी येत होता. यावेळी निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील कंकणवाडीजवळ शालेय वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून दोन्ही विद्यार्थ्यांना उतरवून वाहन पुढे गेले. सदर विद्यार्थी रस्ता ओलांडून घरी जात असताना मुलाला दुचाकीने जोराची धडक दिली. त्यानंतर पाठीमागून येणारे वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर दुचाकी वाहनासह दुसरा वाहनचालक पसार झाला आहे. घटनास्थळी रायबाग पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस पसार झालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत. या अपघातात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.