

Belgaum BJP Workers Protest
बेळगाव : बेळगावात काँग्रेसचा संविधान वाचवा मेळावा आज (दि.२८) सुरू असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी धुडघूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण सुरू होताच भाजप महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून काँग्रेस सरकारचा निषेध केला. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी महिलांना कार्यक्रमास्थळावरून बाहेर ढकलत रस्त्यावर आणले. यावेळी एकच गोंधळ उडाला.
यावेळी सर्वांनी महिलांना अटक करा, नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ, असे म्हटल्यावर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्या महिलांना अटक केली. त्यानंतर महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यक्रमातून उठून जात पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही असताना इतर पक्षाच्या महिला कार्यक्रमात कशा काय येऊ शकतात? असा जाब विचारला आणि पोलिसांवर संताप व्यक्त केला. त्यानंतर लक्ष्मी हेबाळकर सुद्धा कार्यक्रमातून तावातावाने निघून गेल्या.
दरम्यान, बेळगाव येथे काँग्रेसच्या मेळाव्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला संतापाने व्यासपीठावर बोलावले आणि त्यांच्याकडे हात वर करून इशारा केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान, भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली आणि काळे कापड फडकावून निषेध नोंदवला.