

विजापूर : बंगळूर येथील चेंगराचेंगरीची घटना पाहता काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजपच्या जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शहरात आंदोलन केले.
येथील गांधी चौकात एकत्र जमलेल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस सत्तेवरून खाली येईपर्यंत लढा थांबणार नाही, अशा आशयाचे फलक घेऊन रोष व्यक्त करण्यात आला.
खासदार रमेश जिगजिनगी म्हणाले, बंगळूरमध्ये आरसीबीच्या विजयोत्सव दरम्यान 11 निरपराध लोकांनी जीव गमावला असून, 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सरकार आणि गृहखात्याने योग्य ती सुरक्षा द्यायला हवी होती. पण अपयश झाकण्यासाठी पोलिस अधिकार्यांवर खापर फोडण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
माजी मंत्री अप्पासाहेब पटणशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आंदोलनात भाजप राज्य एससी मोर्चाचे सरचिटणीस उमेश कारजोळ, उमेश कोळकूर, सुरेश बिरादार, मल्लिकार्जुन जोगूर, विजय जोशी, महेंद्र नायक, नगरसेवक राहुल जाधव, राजू मग्गीमठ, राजेश तवसे, रवीकांत बगली आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.