

बंगळूर : भाजप नेते आणि दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर मतदारसंघाचे आमदार बी. पी. हरीश आता अडचणीत सापडले आहेत. महिला पोलिस अधिकार्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक उमा प्रशांत यांनी दावणगिरीच्या केटीजे शहर पोलिस स्थानकात आमदार बी. पी. हरीश यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी पोलिस अधिकार्यांबाबत अपमानास्पद शब्द बोलल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 79 (महिलेचा अपमान करणे) आणि 132 (सरकारी नोकराच्या कर्तव्यात अडथळा आणणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार हरीश यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांवर टीका केली होती. शमनूर कुटुंब एक तास उशिरा भेटायला आले तरी जिल्हा पोलिस अधीक्षक कुत्र्यासारखे त्यांच्या दारात वाट पाहत असतात, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. आमदार बैठका आणि कार्यक्रमांना येतात तेव्हा एसपी तोंड फिरवून बसतात. शमनूर कुटुंब येते तेव्हा ते कुत्र्यांसारखे वागतात, असे आमदार हरीश यांनी म्हटले होते. या विधानानंतर पोलिस अधीक्षक उमा प्रशांत यांनी आमदाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे.