बेळगावात काँग्रेस सरकार विरोधात भाजपची जन आक्रोश यात्रा
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, मुस्लिमांना विशेष आरक्षण व मागासवर्गीय निधीचा दुरुपयोग या विरोधात भाजपने बुधवारी (दि.१६) बेळगावात जनआक्रोश यात्रा काढली. यावेळी भाजपने काँग्रेस सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेस सरकारला लक्ष्य करत भाजपने राज्यातील काँग्रेस सरकार कुचकामी ठरल्याचे म्हटले. या जन आक्रोश यात्रेचे नेतृत्व भाजप राज्याध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी केले. (BJP Jan Akrosh Yatra)
पहिल्या टप्प्यातील यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर भाजपने दुसऱ्या टप्प्यात जनआक्रोश यात्रा काढली. पक्षाचे नेते मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. गोवावेस येथील बसवेश्वर चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरून यात्रेला प्रारंभ झाला. शहापूरमधील नाथ पै चौक मार्गे ही यात्रा शिवाजी उद्यानात पोहोचली. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी प्रखर उन्हातही उत्साहाने यात्रेत सहभाग नोंदवला. काँग्रेस सरकारने 50 हून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून गरीब व मध्यमवर्गीय जनतेवर अन्याय केला आहे, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या यात्रेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, खासदार जगदीश शेट्टर, गोविंद कारजोळ, आमदार अभय पाटील, भालचंद्र जारकीहोळी, निखिल कट्टी, दुर्योधन ऐहोळे, नेते बी. श्रीरामूलू, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, पी. राजीव यासह अन्य नेते आणि कार्यकार्ये सहभागी झाले होते.

