‘बेळगाव दक्षिण’मध्येही मिळणार जन्म-मृत्यू दाखले

आरोग्य स्थायी समिती बैठकीत निर्णय; श्वान निर्बिजीकरणासाठी केके कोप्पमध्ये जागा
‘बेळगाव दक्षिण’मध्येही मिळणार जन्म-मृत्यू दाखले
File Photo
Published on
Updated on

बेळगाव : एकाच ठिकाणी जन्म-मृत्यू दाखले वितरण करण्यात येत असल्यामुळे लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी बेळगाव दक्षिणमध्ये वेगळे केंद्र सुरू करण्याचा निर्णय आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्रासाठी नगरप्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या नूतन इमारतीतील स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि. 26) श्रीशैल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जन्म-मृत्यू दाखल्यांचा विषय चर्चेला आला. सदस्य राजू भातकांडे यांनी जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी लोकांची रोज मोठी रांग लागलेली असते. अनेकदा सर्व्हर नसल्यामुळे लोक दिवसभर थांबूनही त्यांना दाखले मिळत नाहीत. लांबून येणार्‍या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, आणखी संगणक आणि कर्मचारी वाढवून लोकांना दाखल्यांचे वितरण करा, असे सांगितले. अध्यक्ष कांबळे यांनी दक्षिण भागातील लोकांसाठी दक्षिणमध्येच जन्म-मृत्यू दाखला वितरण विभाग सुरू करण्यात यावा, असे सांगितले.

मात्र, एकच डिजिटल की असल्यामुळे दुसरीकडे विभाग सुरू करता येत नाही, अशी अडचण आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सांगितली. अध्यक्षांनी नव्या डिजिटल की साठी सरकारकडे पाठपुरावा करा आणि दक्षिणमध्ये केंद्र सुरू करा, अशा सूचना केल्या. त्यावर डिजिटल की साठी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून दक्षिणमध्ये केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. नांद्रेंनी दिली. एकाच ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे जन्म-मृत्यू दाखले वितरण एकाकडे आणि दुरुस्तीचे दाखले दुसरीकडे देण्याची सोय करावी, अशाही सूचना करण्यात आल्या.

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांचा विषय चर्चेला आला. त्यावर आरोग्याधिकार्‍यांनी निर्बिजीकरण केंद्र शहराबाहेर करण्यासाठी आजच आयुक्त शुभा बी. आणि आपण केके कोप्पजवळ जागेची पाहणी केली आहे. लवकरच त्याठिकाणी केंद्र सुरू होईल. आता रोज आठ ते दहा कुत्री पकडण्यात येत आहेत, असे सांगितले. तर मोकाट जनावरांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात रहदारीला त्रास होत आहे. त्यावरही कारवाई करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यावेळी दीपाली टोपगी, माधवी राघोचे, रुपा चिक्कलदिनी, अस्मिता पाटील, लक्ष्मी लोकरी, पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, अभियंते आदिलखान पठाण, प्रवीणकुमार खिलारे यांच्यासह आरोग्य निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news