Vijapur Roof collapse: निवारास्थळाने घेतले चार जीव

वादळाने घराचे छप्पर कोसळून दोन मुलांसह दाम्पत्य मृत्युमुखी
Vijapur Roof collapse: निवारास्थळाने घेतले चार जीव
Published on
Updated on

विजापूर : मूळ घराची दुरुस्ती करण्यासाठी भाडोत्री घरात राहण्यास गेलेल्या कुटुंबातील दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा घराचे छप्पर कोसळून अंत झाला आहे. वादळी पावसामुळे गुरुवारी रात्री घराचे छप्पर कोसळले. झोपी गेलेले पती, पत्नी, त्यांची दोन मुले त्याखाली सापडून मृत्युमुखी पडली. निवारास्थळानेच चार जीव घेतले. दाम्पत्याचा एक मुलगा आणि आजी असे दोघे जण बचावले आहेत.

विजापूर जिल्ह्याच्या आलमेल तालुक्यातील मोरटगी गावात शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली. गुरुनाथ बडिगेर (वय ३५), त्यांची पत्नी ज्योती (वय २८), मुलगी काळम्मा (वय १३), दुसरी मुलगी कीर्ती (वय ९) अशी मृतांची नावे आहेत. गुरुनाथ बडिगेर यांची आई शांताबाई आणि मुलगा वीरेश (वय १०) हे दुसऱ्या खोलीत झोपले असल्याने थोडक्यात बचावले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बडिगेर कुटुंबाने आपले स्वतःचे घर दुरुस्तीला काढले आहे. त्यामुळे ते शेजारीच भाडोत्री घरात राहत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री जेवण करून ते झोपी गेले होते. मध्यरात्री वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात भाडोत्री घराचे छप्पर अचानक कोसळले. त्याबरोबर एका खोलीत झोपलेल्या चौघांचा झोपेतच मृत्यू झाला. त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. तर दोघे दुसऱ्या खोलीत झोपल्याने ते बचावले.

छप्पर कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्याबरोबर शेजारी उठले. त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता घडलेल्या प्रकाराची कल्पना आली. तातडीने ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. तसेच, पोलिस आणि अग्निशमन विभागालाही कळवले; पण चौघांना वाचविण्यात यश आले नाही. महसूल, पोलिस, आरोग्य आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पालकमंत्री एम. बी. पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. आनंद के., एसपी लक्ष्मण निंबरगी, जिल्हापंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद उपस्थित होते.

सिंदगीचे आ. अशोक मनगुळी, माजी आ. रमेश भूसनूर, नरसिंगसा तिवारी, अशोक वारद, विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. घटनेची नोंद सिंदगी पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news