

निपाणी : शहराबाहेरील एका शिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्यावरून पडून बिहारमधील तरुण कामगार शैलेशकुमार सहानी (वय १८, रा. भुपतपूर, बिहार) याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली असून याबाबतची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेशकुमार हा आपल्या भाऊ आणि मित्रासह बांधकाम कामासाठी निपाणी येथे आला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे तो चौथ्या मजल्यावर काम करत असताना अचानक तोल जाऊन तो खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी मृत शैलेशकुमारचा भाऊ नितेशकुमार सहानी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनंतर सीपीआय बी. एस. तळवार आणि उपनिरीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक पवार करत आहेत.