

बंगळूर : शहरात एका ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली झालेला घोटाळा उघडकीस आला आहे. क्रिस्टल एआय नावाच्या कंपनीमार्फत शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
सीसीबी पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कामत यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करत केली जात आहे. रोबोट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवलेले पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन देऊन लोकांना जाळ्यात अडकवल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्राथमिक तपासात 5 ते 6 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची वास्तविक रक्कम शेकडो कोटींपर्यंत पोहोचली असावी, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात बंगळूर शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
संशयितांनी दुबईमध्ये कार्यालय उघडून आपल्या फसवणुकीच्या जाळ्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला आहे. राजेश कामत यांच्यासह आणखी दोन आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचा संघटित कट रचला असल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला आहे.