

बेळगाव : आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीला सरकार थेट जबाबदार असल्याचा आरोप करुन सरकारचा राजीनामा मागणार्या भाजपला कुंभमेळ्यातील मृत्यूंबाबत पंतप्रधान, गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचे आव्हान परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिले.
बेळगाव दौर्यावर आलेल्या मंत्री रेड्डी यांनी शुक्रवारी (दि. 6) विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. बंगळुरातील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि त्यासाठी आरसीबी संघ व्यवस्थापन आणि स्टेडियम प्रशासन थेट जबाबदार आहे. विजयोत्सवादरम्यान आयोजकांनी चूक केली. सरकार थेट जबाबदार असू शकत नाही. जर या घटनेसाठी सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जबाबदार असतील तर कुंभमेळ्यातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील पर्यटक, युद्धात 40 सैनिक शहीद झाले.
यासाठी केंद्र सरकार जबाबदार नाही का, असा सवाल मंत्री रेड्डी यांनी करत पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने करावी, असे आव्हान रेड्डी यांनी केले.