

बंगळूर : येथील काही प्रतिष्ठित खासगी स्कूलसह 40 हून अधिक शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलद्वारे आलेल्या संदेशामुळे शाळांच्या व्यवस्थापनाला धक्का बसला. काहींनी त्यांच्या मुलांना घरी पाठवले तर काहींनी पोलिसांना कळवले.
शहरातील भारतीनगर, कब्बन पार्क, राजराजेश्वरी नगर, केंगेरी आणि इतर पोलिस स्थानक परिसरातील 20 हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सर्व शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. शुक्रवार, दि. 18 रोजी सकाळी 9 वाजता शहरातील अनेक शाळांना एका अज्ञात स्रोताकडून ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. यामध्ये शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली. शाळेत बॉम्ब असे शीर्षक असलेले ई-मेल एका संकेतस्थळावरुन पाठवण्यात आले होते.
ई-मेलमध्ये म्हटले आहे की, स्फोटके काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवली आहेत. कोणत्याही क्षणी त्याचा स्फोट होईल. एकही वाचणार नाही. फक्त पालक शाळांमध्ये येऊन त्यांच्या मुलांचे मृतदेह स्वीकारताना दिसतील. तुम्हाला सर्वांना हे ऐकून दुःख झाले पाहिजे. मला माझे आयुष्य खरोखर आवडत नाही. स्फोट झाल्याची बातमी आल्यानंतर मी आत्महत्या करेन. कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टरने माझी काळजी घेतली नाही.
एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याची बातमी वार्यासारखी पसरताच शाळा प्रशासनाला तात्काळ सतर्क करण्यात आले. त्यांनी जवळच्या पोलिस स्थानकात कळवले. फोन येताच, घटनास्थळी श्वानपथक, बॉम्ब निकामी करणारे पथक आणि मेटल डिटेक्टर तैनात करण्यात आले. प्रगत उपकरणांचा वापर करून शाळेतील सर्व खोल्यांची तपासणी करण्यात आली.
शाळांना बॉम्बची धमकी मिळाल्याची बातमी ऐकून पालकांनी त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीने शाळांमध्ये धाव घेतली. काही पालकांनी त्यांच्या मुलांना घरी नेले. हा बनावट मेल असल्याचा संशय आहे. त्यामुळे, मुलांच्या हितासाठी, शहर पोलिसांनी ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता शाळांमध्ये पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने पालक आणि मुलांना काळजी करू नये, असे आवाहन केले आहे.