

बंगळूर : शहरातील दक्षिण विभागात झालेल्या 7.11 कोटी रुपयांच्या दिवसाढवळ्या दरोड्याप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी दरोड्यात लंपास केलेल्या रकमेपैकी पाच कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम चेन्नई आणि आंध्र प्रदेशमधून हस्तगत करण्यात आली आहे.
या दरोड्यात मुख्य सूत्रधार असलेल्या आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील दोन भावांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. हे दोघेही शहरात काम करत होते आणि त्यांची पोलिस कर्मचार्याशी ओळख होती. गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले; मात्र ती सार्वजनिकरीत्या उघड करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
पोलिस कर्मचारी गजाआड
या दरोड्याचा मास्टरमाईंड असलेल्या शहराच्या पूर्व विभागातील एका पोलिस कर्मचार्याला आणि केरळमधील एका कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या (सीएमएस) माजी कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे. हे दोघेही जवळचे मित्र असून, ‘सीएमएस’ सोडल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी हा कट रचला होता.