

बंगळूर : संभाव्य इंधन पुरवठा तुटवड्याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याने पेट्रोल पंपांसाठी नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणात इंधन गैरवापर व अनधिकृत साठवणुकीविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, बाटली, प्लास्टिकचे कॅन व धोकादायक कंटेनरमधून पेट्रोल व डिझेल नेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केवळ वाहनांच्या इंधन टाक्यांमध्ये किंवा अधिकृत कंटेनरमध्येच केला जावा. कोणत्याही परिस्थितीत बाटल्या, प्लास्टिकचे डबे किंवा इतर कोणत्याही अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच सरकारने मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठ्यावरही मर्यादा घातली आहे. पेट्रोल पंप केवळ वाहनांना किंवा अधिकृतपणे मंजूर केलेल्या कंटेनरमध्ये जास्तीत जास्त २०० लिटर इंधन देऊ शकणार आहेत. तपासणी दरम्यान कोणताही गैरव्यवहार दिसून आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिला आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमुळे शेतकरी व कृषी कामांवर परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासन आणि अधिकाऱ्यांना मत्स्यव्यवसाय व चालू कृषी हंगामात शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये, हे सुनिश्चित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.