

कोप्पळ : देवदर्शनाला जाताना कोप्पळजवळ चारचाकी ओम्णी व ट्रक अपघातात एकाच कुंटूबातील 5 जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झालेत. ह्दयद्रावक घटना शनिवारी (दि. 27) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास भानापूर (ता. नोकनोरू, जि. कोप्पळ) येथे राष्ट्रीय महामार्ग ६३ वर घडली आहे. या अपघातात केंचम्मा बाळेकाई (वय 35), अमृता कोट्याळ (वय 25), रमेश बळ्ळारी (वय 45) व प्रवीण बाळेकाई (वय 40) व चिन्मय अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सदर कुंटूब हावेरीहून ओम्णी चारचाकीतून देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या लॉरीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती लॉरी रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या चारचाकी ओम्णीला धडकली. धडक इतकी भिषण होती, की एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी कोप्पळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या तीव्रतेमुळे चारचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. घटनेनंतर लगेचच स्थानिक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.