

खानापूर : खानापूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत मतदारसंघांचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यातील जिल्हा पंचायतच्या सहा मतदारसंघांसह तालुका पंचायतच्या २० मतदारसंघांसाठी विविध प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीच्या मतदारसंघांचे आरक्षण स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दिशा मिळाली आहे. काही मतदारसंघांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्याने तेथील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी आरक्षित झालेल्या मतदारसंघांमध्ये संबंधित प्रवर्गातील इच्छुकांच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
आरक्षणानुसार सहापैकी पाच मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे महिला उमेदवारांना जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्वाधिक संधी मिळणार आहे. तर तालुका पंचायतीच्या २० पैकी १० मतदारसंघांत महिलांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विविध राजकीय पक्ष कोणत्या उमेदवारांना संधी देतात, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरक्षणाच्या घोषणेनंतर स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा पंचायत आरक्षण
जांबोटी- सामान्य
गर्लगुंजी- सामान्य (महिला)
पारिश्वाड- अनुसूचित जाती (महिला)
कक्केरी- अनुसूचित जमाती (महिला)
नंदगड- मागासवर्ग अ (महिला)
लोंढा- सामान्य(महिला)