

बेळगाव/अंकली : युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना ऐनापूरमध्ये (ता. कागवाड) उघडकीस आली आहे. संतोष सिद्धाप्पा कमते (वय ३८, रा. ऐनापूर, ता. कागवाड) असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र, पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून संशयितांना काही तासांत ताब्यात घेतले आहे. बाहुबली बाळासाहेब भोसगे (वय २८) व श्रीशैल कल्लाप्पा मडीवाळर (वय ३१, दोघेही रा. ऐनापूर ता. कागवाड) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि. २६) दुपारी १.३० ते सायंकाळी ५.२० या कालावधीत काहीजणांनी संतोष कमते यांचा डोक्यात दगड घालून खून केला होता. घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी कागवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मृत संतोष यांचे वडील सिद्धाप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कागवाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपासासाठी अथणी विभागाचे उपाधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
अथणीचे पोलिस निरीक्षक संतोष हल्लूर आणि कागवाडचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक माहिती, स्थानिक खबर्यांचे जाळे आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे तपास सुरु केला. काही तासांतच संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून संशयितांची सखोल चौकशी सुरु आहे.