Belgaum Accident: बसच्या चाकाखाली सापडून तरुण ठार

अनगोळ हरी मंदिराजवळील घटना : बसची दुचाकीला धडक; मृत नेजचा
Belgaum Accident: बसच्या चाकाखाली सापडून तरुण ठार
Published on
Updated on

बेळगाव : भरधाव दुचाकीची बसला धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. अनगोळमधील हरी मंदिरजवळील पहिल्या क्रॉसजवळ गुरुवारी (दि. १०) दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. सुनील धूळगौडा पाटील (वय २५, रा. नेज, ता. निपाणी) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुनील पाटील हा गणेशमूर्ती बघण्यासाठी तसेच गणेश मंडपासाठी आरास खरेदी करण्याकरिता बेळगावला आला होता. अनगोळ येथील मूर्तिकाराजवळ मूर्ती पाहून दुचाकी घेऊन तो आरास खरेदीसाठी अनगोळ डीव्हीएस चौकाकडून बेळगावच्या दिशेने येत होता. यावेळी खानापूर रोडवरून अनगोळकडे बस निघाली होती. भरधाव दुचाकीची बसला धडक बसल्याने सुनील हा रस्त्यावर कोसळला. बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच रहदारी दक्षिण विभागाचे उपनिरीक्षक अभिषेक नाडगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. रहदारी दक्षिण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेल्मेट असते तर...

दुचाकी चालवताना तरुणाने हेल्मेट घातले नसल्याचे रहदारी पोलिसांनी सांगितले. रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने डोके फुटून त्याचा मृत्यू झाला. त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचित जीव वाचला असता, अशी चर्चा बघ्यांमध्ये सुरू होती. पोलिस खात्याकडून हेल्मेटबाबत सातत्याने जागृती करूनही अनेक दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. त्यामुळे असे गंभीर अपघात घडतात. प्रत्येकाने हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news