

बेळगाव : नोकरी करायची नाही, मेंढ्या राखायच्या आणि मेंढराच्या कळपातच झोपायचे, असे दादा मला सतत सांगायचा, सातत्याने मारहाण करायचा. याच रागातूनच त्याच्या डोळ्यात चटणीपूड फेकून खून केल्याची कबुली धाकट्या भावाने दिली आहे. बसवराज सुरेश कमती (वय 24, रा. हट्टीअलूर, ता. हुक्केरी) असे खुनी भावाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ रायाप्पा सुरेश कमती (वय 28) याचा 9 मे रोजी खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.
अधिक माहिती अशी : दि. 8 मे रोजी रायाप्पा हा मेंढरे चारण्यासाठी माळरानावर गेला होता. दुपारी दीड ते सायंकाळी साडेसहा या काळात पाच्छापूर गावच्या हद्दीतील खुल्या जागेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी त्याचे वडील सुरेश बीराप्पा कमती यांनी यमनकमर्डी पोलिसांत मुलाचा खून झाल्याची फिर्याद दिली होती.
पोलिसांकडून तपास : रायाप्पाचा खून करण्याआधी त्याच्या डोळ्यांत चटणी फेकण्यात आली होती. यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून झाल्याचे समोर आले होते. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी तपास सुरू केला होता.
त्याचे कोणाशी भांडण होते, त्याचे गावातील वागणे व इतर बाबींची माहिती त्यांनी घेतली. परंतु, आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नाही. मग खून कोणी व कशासाठी केला, याबाबत काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते.
चारीही दिशांनी तपास केल्यानंतरही खुनी न सापडल्यामुळे मुशापुरी यांनी तपासाची दिशा बदलली. यावेळी मात्र मृताचा धाकटा भाऊ बसवराजने खून केल्याचे स्पष्ट झाले. बसवराजने पोलिसांना सांगितले की, रायाप्पा आपला भाऊ मोठा असल्याचा दाब दाखवत दररोज मला मेंढ्या राखायला ये म्हणून मारहाण करत होता. दररोज रात्रीही मला मेंढ्यांच्या कळपातच झोपत जा, असेही सांगायचा. सातत्याने तेथेच झोपायला भाग पाडायचा. खरे तर मला नोकरी करायची होती. परंतु, आपला भाऊ जन्मभर मेंढरे पाळायलाच सांगणार, याचा मनात राग होता. याच रागातून 8 मे रोजी घरातून चटणीपूड घेतली. रायाप्पा मोबाईल बघत बसला होता. पाठीमागून जाऊन त्याच्या डोळ्यांवर चटणी फेकली. तो डोळे चोळत असतानाच त्याच्या डोकीत दगडाने वार करून खून केला.