

बेळगाव : येळ्ळूर गावातील स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव तीव्रतेने जाणवत आहे. हायमास्ट दिवे बंद असल्याने नागरिकांना मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या गैरसोयीमुळे ग्राम पंचायतीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येळ्ळूर स्मशानभूमीत प्रकाशासाठी काही स्मशानभूमींमध्ये हायमास्टची सुविधा उपलब्ध असली तरी, दिवे नादुरुस्त अवस्थेत असल्याने सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. परिणामी, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडावा लागतो. स्मशानभूमी परिसरात झाडाझुडपांचे प्रमाण अधिक असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावरही वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागत आहे.
काही स्मशानभूमींमध्ये या हायमास्ट दिव्यांसाठी ग्राम पंचायतीमार्फत हजारो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून ते बंद अवस्थेत असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी ग्राम पंचायतीकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. याशिवाय, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूंनी झुडपे आणि रस्त्यावर खड्डे असल्याने समस्या निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.