

अंकली : हिप्परगी धरणाचे 22 वे गेट तुटल्याने जवळपास दोन टीएमसी पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे येडूर-कल्लोळ बंधाऱ्याचे पाणी पूर्णपणे वाहून गेल्याने पाणी पातळी घटली आहे. भविष्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात असून येडूर-कल्लोळ बंधाऱ्याला बरगे घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भविष्यामध्ये पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. चिकोडी, रायबाग, कागवाड आणि अथणी या चार तालुक्यांमध्ये दर रविवारी नदीकाठावरील वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत.
हिप्परगी धरणाच्या 22 व्या क्रमांकाचे गेट तुटल्याने मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या धरणात 6 टीएमसी पाणीसाठा होता.गेट तुटल्यामुळे सुमारे 2 टीएमसी पाणी वाहून गेले आहे. सध्या केवळ 4 टीएमसी पाणी शिल्लक असून येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता वाढली आहे. हिप्परगी धरणातून बहुग्राम पाणीपुरवठा योजनांसाठी तसेच शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी दिले जाते.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांनी एप्रिलअखेर आणि मे महिन्यात तीव्र पाणीटंचाई उद्भवू शकते, असा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आताच पाण्याचा अपव्यय थांबवणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे. कृष्णा नदीतून सुरू असलेला अनियंत्रित पाणी उपसा तातडीने न थांबविल्यास उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कृष्णा नदीतील पाणी पातळी घटली असून येडूर-कल्लोळ बंधाऱ्याला बरगे घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.