Belgaum Theft : अंधाराचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

दोन तोळ्यांचे गंठण हिसकावून चोरटे पसार; आप्पाचीवाडी-कुर्ली मार्गावरील घटना; महिला जखमी
Gold Theft
Gold TheftFile Photo
Published on
Updated on

निपाणी : आप्पाचीवाडीहून कुर्लीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची अडवणूक करून अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. चोरट्यांनी जोरात हिसका दिल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून महिला रस्त्यावर पडली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आप्पाचीवाडी-कुर्ली मार्गावरील गारगोटे मळ्याजवळ ही घटना घडली.

दिपाली अजय गारगोटे (वय २७, रा. गारगोटे मळा, कुर्ली रोड, आप्पाचीवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली गारगोटे गुरुवारी सायंकाळी आप्पाचीवाडी येथून देवदर्शन व आरती आटोपून स्कुटीवरून कुर्लीच्या दिशेने निघाल्या होत्या. त्या कुर्ली रोडवरील गारगोटे मळ्याजवळ आल्या असता, रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांची स्कुटी अडवली.

दिपाली यांना काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण जोराने हिसकावले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दिपाली रस्त्यावर पडल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. गंठण लांबवल्यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दिपाली यांना मदत केली. या प्रकारामुळे आप्पाचीवाडी आणि कुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news